घेतला का तु पहिल्या पावसातून,
निघणारा मातीचा वास।
आठवले का तुला ते अंगणात,
भिजून शांत उभं राहणं॥
त्या दिवसातला गरम चहा, कांदाभजी,
भर पावसात मारलेली ती गाडीवरची सैर।
डबक्यांतून पाणी उडवत मारलेला उड्या,
नाल्यातून निघालेली कागदाच्या होडीची फेर॥
त्या भिजलेल्या डोंगरावर जाणं ते चढत,
ढगांतून मंदिराची वाट शोधत,
त्या हिरव्या गवतावरून,
समोरचा इंद्रधनुष्य निहाळत॥
जवान, भिजलेलं, निर्मळ, सौम्य, गार,
या पहिल्या पावसातलं आयुष्य,
आणि त्या पहिल्या पावसात झालेलं,
तुला ते पहिलं पहिलं प्रेम॥
कसं तिला तु पाहिलं होतं चिंब भिजलेलं,
थेंबांच्या दागिन्यांनी सजलेलं,
त्या तुझ्या तरुण हृदयावर,
पडलेली पहिली पहिली विज ॥
नंतर चाललेला तुझ्या प्रेमाचा ऊन-पावसाचा खेळ,
पावसाच्या धारांचा अश्रूंशी झालेला मेळ,
तिच्याबद्दल तुझ्या त्या गप्पा ते प्रेम,
आता पण वाटतं का तुला सेम?
नसेल वाटतं सेम तर निघ बाहेर जरा
तुझ्या त्या दोन बीएचके फ्लैट मधून बाहेर,
भिजून जरा आठव सारे,
होते कसे ते दिवस न्यारे॥
अजूनही तसाच येतो मातीचा वास,
तसाच पडतो तो अंगणात पाऊस॥
जवान, भिजलेलं, निर्मळ, सौम्य, गार,
अजूनही तसंच आहे त्या पहिल्या पावसातलं आयुष्य॥