Оберіть трек для відтворення
दूर देशी राहिलेले दीन त्याचे झोपडे
बापुडा अन् आज येथे पायवाटेला पडे
शोधण्याला भाकरीचा घास आला योजने
आणि अंती मृत्यूच्या घासात वेडा सापडे
दूर देशी राहिलेले दीन त्याचे झोपडे
भोवतीचे उंच वाडे क्रूरतेने हासती
मत्त शेजारून कोठे आगगाडी ओरडे
आणि चक्रे चालली ती हो महाली गल्बला
चालला हो प्राण त्याचा पापणी खाली पडे
थांबल्या त्या हालचाली थांबले काळीज हो
आणि माशांचा थवा मुद्रेवरोनी बागडे
दूर देशी राहिलेले दीन त्याचे झोपडे
मानवांच्या संस्कृतीची काय लागे ही ध्वजा
तीस कोटी दैवतांच्या की दयेचे हे मढे
मूक झालेल्या मुखाने गर्जते का प्रेत हे
घालिती हे बंद डोळे का निखार्याचे सडे
अन् अजुनी हासती उन्मत्त हो प्रासाद ते
वेग-वेड्या वाहनांचा घोष ये चोहिकडे
भेकडांनो या इथे ही साधण्याला पर्वणी
पेटवा येथे मशाली अन् झडू द्या चौघडे
दूर देशी राहिलेले दीन त्याचे झोपडे