Оберіть трек для відтворення
कसं उघडावं डोळं कसं तोडावं ते टाळं
लेक लहुजीची सांगती
मुक्ता माझी वाट दावती ज्ञानाचं गं दिवं लावती
जलम मांग महाराचा का चालला फुका गं
केला सवाल धर्माला धरम झाला मुका गं
कुणी केली नजरबंदी कोण लावतुय थुका गं
सवालाची रास मांडती
बया भोंदू धर्माशी भांडती
मुक्ता माझी वाट दावती
ज्ञानाचं गं दिवं लावती
लेकी बाळी सोडा देवाला काय त्यांच्या चुका गं
दगडात चिणतो धर्म तुम्ही दगडाम्होरं झुका गं
माणूस म्हणून जगण्याच्या मेल्या किती भुका गं
अज्ञानाचा कातळ फोडती
मेंदूचा फास काढती
मुक्ता माझी वाट दावती ज्ञानाचं गं दिवं लावती
मांग महार वाद आग लावतुया गं वाद्या
झुंजी झुंजवून साऱ्या उबविल्या गं गाद्या
निवडुंगाचं कुपान जुनं मोडू द्या गं उद्या
बेकीचा आयना दावती
एकीचा मायना लिवती
मुक्ता माझी वाट दावती ज्ञानाचं गं दिवं लावती
जोती साऊ सांगती लावा ज्ञानाचा व दिवा
सांगावा लहुजींचा तुम्ही ध्यानामधी ठिवा
अज्ञान पाहूनिया घोर लागतोया ग जिवा
दुःखाचा माग काढती
पंगतीला उजेड वाढती
मुक्ता माझी वाट दावती ज्ञानाचं गं दिवं लावती